बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने रविवारी (19 नोव्हेंबर) ९०२४ टन उसाचे उच्चांकी गाळप केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन एम. पी. पाटील यांनी दिली. कारखान्याची गाळपक्षमता ५०० टन आहे. ६००० टनाची नवीन मिल व २५०० टनाची जुनी मिल पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झाल्याने कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी गाळप करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन पवन कुमार पाटील उपस्थित होते.
एम. पी. पाटील म्हणाले, कारखान्याने २३ दिवसांत १ लाख ५९ हजार ७८ टन उसाचे गाळप केले आहे. यातील १ लाख २२ हजार ७४० टन ऊस निपाणी भागातील आहे. कारखान्याचे मार्गदर्शक खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी भागातील ऊस तोडणीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयानुसार ऊस तोडणी सुरू आहे. कारखान्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत ८ कोटी २५ लाख रुपये शेतकरी सभासदांच्या खात्यावर जमा केले आहेत. आता १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या १ लाख ५५७० टन गाळपाचे बिल ३१ कोटी ६७ लाख रुपये आज (दि. २०) शेतकरी सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
पाटील म्हणाले, कारखान्याने ७० लाख ७७ हजार दोनशे युनिट विजेचे उत्पादन घेतले आहे. त्यापैकी ३५ लाख ९८ हजार ९१० युनिट वीज हेकॉमला विकण्यात आली आहे. हालसिद्धनाथ कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. त्यामुळे कारखान्याची आर्थिक बचत झाली आहे. निवडणुकीवर होणारा खर्च शेतकरी सभासद व कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून करण्याचा निर्णय खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी जाहीर केला होता. या निर्णयानुसार संचालक मंडळाने शेतकरी सभासद व कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून कारखाना प्रशासनाकडे अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक राजू खराबे, जनरल मॅनेजर काशिनाथ शेट्ये, सिद्धू नराटे यांची उपस्थिती होती.