अहमदनगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता ५ हजार ५०० मेट्रिक टन असताना एका दिवसात विक्रमी ९ हजार १२० मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. म्हणजे कार्यक्षमतेच्या १६५ टक्के विक्रमी सरासरीने उत्पादन झाले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली. यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही सन २०२३ – २४ या हंगामात कारखान्याने ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केल्याचेही ते म्हणाले.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, चालू हंगामात दुष्काळी परिस्थिती असतानाही आठ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा पार केला आहे. कारखान्याच्या या कामगिरीत आ. बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन, अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजीत थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे. कारखान्याने एका दिवसात केलेल्या विक्रमी ऊस गाळपाबद्दल कारखान्याचे व्यवस्थापन, सर्व संचालक, कार्यकारी संचालक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. कारखान्याने बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.