कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही आघाड्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीला प्रयत्न झाले. मात्र, त्याला यश आले नाही. आता निवडणुकीत कारखाना कसा कर्जमुक्त होईल ? गाळप कसे वाढेल? उपपदार्थ निर्मिती यावर भाष्य गरजेचे आहे. मात्र, वैयक्तिक टीकाटिप्पणीला जोर आला आहे.
आजरा कारखाना यापूर्वी रेणुका शुगर्स व वारणा समूहाला चालवायला दिला होता. रेणुकाच्या व्यवस्थापनाने कारखाना चांगला चालवून कामगारांचे वेळेत पगार व उसाला एकरकमी दरही दिला होता. अडीच हजार गाळप क्षमता असतानाही पाच लाखांपेक्षा अधिक मे. टन उसाचे गाळप केले होते. आता निवडणुकीदरम्यान, प्रचार सभा आणि पत्रकार परिषदांमधून बेअरिंग चोरी प्रकरण, माजी अध्यक्षांच्या गाडीच्या चाव्या काढून घेणे, कारखाना बंद पडल्यानंतर चालू करण्यासाठी पैसा कुणी उभा केला याची चर्चा सुरू आहे.
दोन्ही आघाड्यांतील शिलेदार पाच वर्षांतील एकमेकांचा वचपा काढत आहेत. मात्र, पाच वर्षे दोन्हीही आघाड्यांतील शिलेदार एकत्र होते. मग निवडणुकीतच त्यांना कारभार कसा चुकीचा वाटू लागला, असा प्रश्न सभासदांचा आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे दोन्ही आघाड्यांचे प्रमुख आहेत. हे नेते वैयक्तिक टीका करीत नाहीत. तसा सुज्ञपणा दोन्ही आघाड्यांच्या प्रमुखांनी दाखवण्याची गरज आहे.