सांगली : बिकर (ता. शिराळा) येथील सोनटक्के वस्तीशेजारी असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरजवळ ११ के. व्ही. च्या उच्च दाब वाहिनीचे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत राजेंद्र बाळकू पाटील यांचा दोन एकरातील ऊस जळाला. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या उसासोबत ठिबक संच जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. शेजारील विश्वास कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबाने काही प्रमाणात आग आटोक्यात आली. ‘स्प्रिंकलर’च्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सायंकाळी साडेसहापर्यंत प्रयत्न सुरू होते.
बिऊर येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र पाटील यांची सोनटक्के वस्तीशेजारी शेती आहे. शामराव कोतवाल हे पाटील यांच्या शेताजवळ काम करीत असताना त्यांना पाटील यांच्या उसाच्या शेतातून आग लागल्याने धूर येत असल्याचे दिसले. त्याची माहिती कळताच पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र उन्हाच्या झळा व वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. विद्युत निरीक्षकांसमवेत घटनास्थळी पुन्हा भेट देऊन पाहणी केली जाईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे शिराळ्याचे उपकार्यकारी अभियंता एल. बी. खटावकर यांनी सांगितले.