कोल्हापूर : गत हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी ३००० रुपयांपेक्षा कमी दर दिला, त्या कारखान्यांना प्रती टन १०० रुपये व ज्यांनी ३००० रुपयांपेक्षा जादा दर दिला, त्यांना प्रती टन ५० रुपये हप्ता देण्याचा तोडगा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य केलेला आहे. याबाबत शासनाकडून दोन महिन्यांच्या आत परवानगी घेऊन दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार शासनाकडून तातडीने साखर कारखान्यांना गत हंगामातील दुसरा हप्ता देण्यासंदर्भातील निर्णयास मान्यता देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापूर विमानतळावर निवेदन दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफी योजनेचा विषयही उपस्थित केला. शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतील व नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे प्रलंबित शेतकऱ्यांनी केवायसी, अटींची पूर्तता केल्याने तातडीने त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर आयुक्तांना गेल्यावर्षीचा हिशोब पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, जनार्दन पाटील, शैलेश आडके, सागर संभूशेटे आदी उपस्थित होते.