कोल्हापूर : कोईमतूरच्या ऊस संशोधन संस्थेच्या धर्तीवर राधानगरीतील कृषी संशोधन केंद्रात ऊस संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऊस संशोधन बळकटीकरण योजना प्रस्तावित केली आहे. त्या अंतर्गत ऊस संकरीकरण संच उभारणी करून अधिकाधिक ऊस संशोधन केले जाईल. येथील हवामानाशी अनुकूल शाश्वत उत्पादनक्षम वाणांची निर्मिती केली जाणार आहे. ऊस संशोधनाची व्यापकता वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सद्यस्थितीत राज्यात पाडेगावचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महत्त्वाचे मानले जाते. याच धर्तीवर राधानगरीचे हवामान ऊसाला फुलोरा येण्यास उपयुक्त असल्याने, एक दशकापूर्वी येथील कृषी संशोधन केंद्रात ऊस संशोधन सुरू झाले. मात्र, संकरीकरण मर्यादित केले जाते. आता ऊस संकरीकरण संच उभारून संशोधन बळकटीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. यासाठी सुमारे साडेतीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून अद्याप उसाचे १६ नवीन वाण विकसित केले आहेत. यातील १४ वाणांची निर्मिती कोईमतूर येथे जाऊन केलेल्या संकरीकरणातून झाली आहे. त्यामुळे ऊस संकरीकरण संच उभारणीतून केंद्राच्या बळकटीकरणासाठी राधानगरी कृषी संशोधन केंद्राबरोबरच पाडेगाव केंद्राचा प्रस्तावात समावेश आहे.