नवी दिल्ली : तोक्ते चक्रीवादळाच्या फटक्याने झालेल्या नुकसानीतून देश सावरत असताना भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवसांत आणखी एका चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली आहे. याआधीच्या तोक्ते चक्रीवादळाने अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
आतापर्यंत या चक्रीवादळात गुजरातमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर महाराष्ट्रात सहा जणांना जीव गमवावा लागला. यांदरम्यान हवामान विभागाने आणखी एक चक्रीवादळ येत असल्याचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ ते २५ मे या कालावधीत हे नवे यश चक्रीवादळ बंगालच्या खाडीपर्यंत पोहोचेल. ओमानने या चक्रीवादळाचे नाव निश्चित केले आहे.
हवमान विभागाने सांगितले की, २३ ते २५ मे या कालावधीत बंगालच्या खाडीत यश हे चक्रीवादळ सुंदरबन परिसरात धडकेल. तेथून हे चक्रीवादळ बांगलादेशच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. या वादळाचे नाव ओमानने निश्चित केले असून याची गती आधीच्या अम्फान इतकी अधिक राहील. गेल्यावर्षी १९ मे रोजी आलेल्या अम्फान वादळाने बंगाल आणि परिसराला उद्ध्वस्त केले होते.
दरम्यान हवामान विभागाने वादळाची दिशा आणि वेगाबाबत अद्याप निश्चित माहिती दिलेली नाही. मात्र मध्य पूर्वेच्या खाडीतून तसेच आसपासच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या आठवड्याच्या अखेरीस याचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते असे विभागाचे म्हणणे आहे. याशिवाय हवामान विभागाने मच्छिमारांना २३ मे रोजी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. कोलकाता, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगालच्या इतर भागात तापमान वाढ झाली असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.