कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने नदीकाठावरील बहुतांश ऊस व भात पिक पाण्याखाली गेली आहेत. पुराचा सर्वाधिक फटका ऊस लागवडीला बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुमारे ४५ हजार हेक्टरवरील उसाचे पीक पाण्यात बुडाले असल्याने सडण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
पुरामुळे ऊसाच्या वरच्या भागात पाणी व माती साचल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 18 जुलैपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा व इतर नद्यांवर बांधलेले 72 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नद्यांचे पाणी शेतीत शिरले आहे. ऊस, भात पिके पाण्यात बुडाली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पाण्यात बुडाल्याने उसाचा उतारा घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.