पानीपत, सोनीपत जिल्ह्यात जवळपास ३० हजार एकर ऊसासह इतर पिके जलमय

पानीपत : गेल्या काही दिवसांपासून यमुनेच्या खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने आणि पुरामुळे पिके जलमय झाली आहेत. त्यामुळे सोनीपत आणि पानीपत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पानीपतमध्ये जवळपास २०,००० एकर जमिनीवरील भात, ऊस, चारा पिके, वांगी, स्वीट कॉर्न, टोमॅटोसारखा भाजीपाला व इतर पिके जलमय झाली आहेत. सोनीपतमध्ये १३,००० एकरपेक्षा अधिक क्षेत्र जलमय झाले आहे.
सततच्या पावसाने आणि हथिनी कुंडमधून यमुनेमध्ये पाणी सोडण्यात आल्याने यमुना नदी अद्यापही धोक्याच्या इशाऱ्यापासून वर म्हणजे २३१.५ मिटर वरून वाहात आहे. सोनीपत जिल्ह्यातील बख्तावरपूर, मछरोला, बडोली, टोकी आणि खुर्रमपूर गावातील गावातील बांध फुटले. खासदार रमेश कौशिक यांनी जिल्हाधिकारी ललित सिवाच यांच्यासोबत बोटीमधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा मुख्यालयानजिकच्या जाजल टोकी गावातील ग्रामस्थांची भेट घेतली. पानीपत जिल्ह्यातील जवळपास ४५ किमी क्षेत्र आणि सोनीपत जिल्ह्यातील ४१.७४ किमी क्षेत्र यमुना तटावर आहे.
पानीपत जिल्ह्यात जवळपास २०,००० एकरातील ऊस, भात, दुधीभोपळा, दोडका, कारले, मक्का, टोमॅटो यांच्यासह सर्व भाजीपाला पिके जलमय झाली आहेत. कृषी विभागाचे उपसंचालक वजीर सिंह यांनी सांगितले की, यमुनेच्या जवळत्या गावात पुरामुळे १८ ते २० हजार एकर जमीन जलमय झाली आहे. पाणी कमी झाल्यावरच एकूण नुकसानीचा आढावा घेतला जाऊ शकेल.

कृषी विभागाचे तज्ज्ञ देवेंद्र कुहाड यांनी सांगितले की, सोनीपतमध्ये नदीचे पाणी यमुनेच्या जवळच्या ३० गावात घुसले आहे. भात, ऊस आणि भाजीपाल्यासह सर्व पिके जलमय झाली आहेत. सोनीपत जिल्ह्याचे महसूल अधिकारी हरिओम अत्री यांनी सांगितले की, पाणी कमी झाल्यावर नुकसानीची पाहणी केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here