ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत पुरामुळे ५०,००० लोकांना फटका

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर असलेल्या सिडनी आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील शेकडो घरांमध्ये पुरामुळे पाणी घुसले आहे. त्याचा फटका जवळपास ५०,००० लोकांना बसला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. न्यू साऊथ वेल्स आपत्ती व्यवस्थापन सेवेचे व्यवस्थापक एश्ले सुलिवन यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन पथकांनी सिडनीत घरे, कारमध्ये पाणी शिरल्याने अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी रात्रभर शंभर ठिकाणी मदतकार्य केले आहे. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे धरणांतील पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. काही जलाशय फुटले आहेत. ५० लाख लोकसंख्येच्या या शहरात गेल्या सोळा महिन्यात चौथ्यांदा पूर आला आहे.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, न्यू साउथ वेल्स राज्य सरकारने रात्रभर स्थानिक सरकारसोबत मदतीसाठी २३ आपत्ती मदत केंद्रांची घोषणा केली. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर डोमिनिक पेरोटेट यांनी सांगितले की, लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुरामुळे पन्नास हजार लोकांना फटका बसला आहे. यामध्ये ३२ हजार लोक सोमवारी स्थलांतरीत झाले आहेत. हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक जोनाथन हाऊ यांनी सांगितले की, दक्षिण सिडनीत गेल्या २४ तासात २० सेंटिमीटर पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here