बुलंदशहर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२२-२३ साठीची तयारी सुरू केली आहे. कारखान्यांचे ३५ टक्क्यांहून अधिक दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. सरकारकडून दररोज कारखान्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगाम सुरू होईल. अद्याप कारखान्यांकडे साडेतीन महिन्यांचा कालावधी आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी कारखान्यांच्या कामाची पाहणी करून उर्वरीत काम वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी बी. के. पटेल यांनी सांगितले की, वेव्ह साखर कारखाना, साबितगढ साखर कारखाना, अनामिका साखर कारखाना आणि अनुप शहरातील दि किसान सहकारी साखर कारखान्यातील दुरुस्तीचे काम ३५ टक्के पूर्ण झाले आहे. कारखान्यांना उर्वरीत कामाचे निर्देश दिले आहेत. गळीत हंगामात अनामिका आणि साबितगढ हे दोन्ही कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. त्यानंतर सहकारी नगर आणि वेव्ह साखर कारखाना दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहेत. ऊस विभागाने या तारखांची निश्चिती केली आहे. चार कारखान्यांसह हापुड, संभल, अमरोहा कारखान्यालाही जिल्ह्यातून ऊस पुरवठा होतो. जिल्ह्यात ७४,९१२ हेक्टरमध्ये ऊस उपलब्ध आहे.