मुंबई : आर्थिक संशोधन एजन्सी इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने शुक्रवारी २०२१-२२ या वर्षासाठी भारताच्या सकल घरेलू उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा अंदाज १०.४ टक्क्यांवरून घटवून १०.१ टक्क्यांवर आणला आहे. देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट पसरल्याने आपल्या आधीच्या अंदाजात संस्थेने सुधारणा केली आहे.
देशाच्या बहुसंख्य भागात कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर प्रचंड दबाव असल्याचे इंडिया रेटिंग्जने म्हटले आहे. कोरोनाची ही लाट मे महिन्याच्या मध्यापासून कमी होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला पतधोरण आढावा बैठकीत चालू वर्षातील जीडीपी १०.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यांदरम्यान देशात कोरोना व्हायरसची वाढती रुग्णसंख्या ही जीडीपी वाढीतील मुख्य अडचण असल्याचे म्हटले होते.
इतर ब्रोकरेज कंपन्या आणि अभ्यासकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक विकास दराचे आपले अनुमान घटवले आहे. गेल्या आर्थिक वर्षात, २०२०-२१ मध्ये भारताच्या जीडीपी दरात ७.६ टक्क्यांची घसरण येण्याचे अनुमान आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आर्थिक फटका पहिल्यासारखा मोठा बसणार नाही असे इंडिया रेटिंग्जने म्हटले आहे. त्यामुळे पहिल्या लाटेतील रुग्ण संख्येच्या तिप्पट रुग्ण असूनही लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक स्तरापर्यंत मर्यादीत ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना लसीकरणामुळेही चांगला परिणाम होत आहे. देशात २१ एप्रिलअखेर १३.२० कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. सरकारने एक मेपासून सर्व वयोगटातील लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी १७६.८० कोटी डोस आवश्यक असतील. लसींचे उत्पादन आणि लसीकरणाची गती यातून कोरोनावर मात करता येईल.
त्यामुळे इंडिया रेटिंग्जने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपीचा अंदाज १०.४ टक्क्यांवरून १०.१ टक्क्यावर आणला आहे, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.