मुंबई: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची (एनएसई) सहायक कंपनी असलेल्या एनएसई डेटा अँड अनालिटिक्सने कोजेन्सिस इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसचे अधिग्रहण केल्याची माहिती एनएसईने दिली आहे. ही कंपनी संस्थात्मक सदस्यांना शेअर बाजाराचा रिअल टाइम डेटा उपलब्ध करून देते. दरम्यान, एनएसई डेटा अँड अनालिटीक्स आणि कोजेन्सिस यांदरम्यान काय सौदा झाला याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
कोजेन्सिस कंपनीकडून प्रामुख्याने कोजेन्सिस वर्कस्टेशनच्या माध्यमातून आर्थिक बातम्यांसह रिअल टाइम मार्केट डेटा टर्मिनल आहे. कोजेन्सिसच्या वर्कस्टेशनमधून परकीय चलन, फिस्क्ड इन्कम, शेअर, कमोडीटी यांसोबत मायक्रो इकॉनॉमिक डाटासह सर्व मालमत्तांशी संबंधीत डेटा उपलब्ध होतो. विविध माध्यमांतून अथवा स्वतःच्या माहिती स्रोतांमधून हा डेटा एकत्रित केला जातो. एनएसई डेटाने याचे १०० टक्के मालकीचे अधिग्रहण केले आहे, ज्यामध्ये समारा कॅपिटल पार्टनर्स फंड लिमिटेड आणि कंपनीचे संस्थापक आणि कर्मचारी कल्याण ट्रस्टचाही हिस्सा समाविष्ट आहे. देवाण-घेवाणीच्या स्वरुपात कोजेन्सिसच्या न्यूज विभागाची विक्री इन्फॉर्मिस्ट मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला करण्यात आली आहे. त्यामुळे कोजेन्सिस न्यूज आता कोजेन्सिसच्या वर्कस्टेशनवर इन्फॉर्मिस्ट न्यूजच्या रुपात उपलब्ध असेल.
एनएसईचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये म्हणाले, एनएसई डेटा आणि कोजेन्सिस हे दोन्ही पूरक व्यवसाय आहेत. त्यामुळे या अधिग्रहण कराराची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.