साठेबाजांवर कारवाई : पाकिस्तानमधील साखरेच्या घाऊक विक्रेत्यांकडून बाजार बंदची घोषणा

कराची : साठेबाजीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने छापे टाकल्याच्या आणि दंडाच्या निषेधार्थ घाऊक विक्रेत्यांनी सोमवारी कराचीतील बाजारपेठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे, असे वृत्त एआरवाय न्यूजने दिले आहे. याबाबत, कराची होलसेल ग्रोसर्स असोसिएशन (KWGA)चे अध्यक्ष रौफ इब्राहिम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हा प्रशासनाने छापे टाकून दुकाने आणि गोदामे सील करून व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरवली आहे. बेकायदा टाकले जाणारे छापे व दंडाची कारवाई थांबवली नाही तर सोमवारी घाऊक बाजार बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईच्या नावाखाली बंद दुकाने आणि गोदामेही सील केली जात असल्याचा आरोप रौफ इब्राहिम यांनी केला. जोरिया मार्केटमधील एका दुकानमालकाला दोन पोती साखर ठेवल्याप्रकरणी ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. साखरेचा १०० ते ५०० पोती साठा ठेवणाऱ्या घाऊक विक्रेत्यांनाही साठेबाज म्हटले जात असल्याची टीका त्यांनी केली. खऱ्या साठेबाजांवर कडक कारवाई करण्याची मागणी इब्राहिम यांनी प्रशासनाकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी, काळजीवाहू सरकारने जीवनावश्यक वस्तूंची तस्करी आणि साठेबाजी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केल्याने साखरेची किंमत आणि उपलब्धता हळूहळू स्थिर आणि सामान्य होत असल्याचे उघड झाले आहे. आपल्या धोरणानुसार, सरकारने तस्करी आणि साठेबाजीत गुंतलेल्यांची ओळख पटवून देणार्‍या नागरिकांसाठी रिवॉर्ड मनी (रोख बक्षीस) देखील योजना आखली आहे.

या उद्देशासाठी, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला खीळ घालणाऱ्या बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेल्या घटकांविरुद्ध आवश्यक माहिती कॉल करुन देण्यासाठी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि गृह मंत्रालयाने एक टोल-फ्री नंबर स्थापित केला गेला आहे.
साठेबाजीला आळा घालण्यासाठी, संघ आणि प्रांतीय सरकारांनी लाहोर, रावळपिंडी, इस्लामाबाद, फैसलाबाद, पेशावर, क्वेटा आणि डेरा इस्माईल खानसह विविध शहरांमध्ये मोहीम सुरू केली आहे, परिणामी बेकायदेशीरपणे साठा केलेली साखर जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनच्या (यूएससी) प्रवक्त्याने सांगितले की, देशभरात नियंत्रित किमतीत साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ते म्हणाले, सर्वसामान्य ग्राहकांसाठी १४७ रुपये किलो आणि बेनझीर इन्कम सपोर्ट प्रोग्रामअंतर्गत नोंदणीकृत ग्राहकांसाठी साखर १०१ रुपये किलो दराने उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here