हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
उसाच्या थकीत एफआरपीप्रकरणी पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांवर कारवाईच्या फेऱ्यात येणार आहेत. सर्वाधिक थकबाकी असलेल्या या कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश त्वरित काढण्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिले आहे.
सर्वाधिक थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीच्या कारवाईचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांच्या दालनासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्याची ग्वाही दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ जानेवारी रोजी साखर आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. या आंदोलनानंतर आयुक्तालयाने 39 साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश काढले. त्यानंतर आयुक्तालयाकडून थकीत एफआरपीप्रश्नीज कारवाई थंडावल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे होते. त्यामुळे संघटनेने पुन्हा ठिय्या आंदोलन करून, १२ कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांचे पुन्हा लक्ष वेधले.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमवेत संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक थकीत एफआरपी असणाऱ्या कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश काढण्याची मागणी या वेळी करण्यात आली. एफआरपीचे तुकडे न पाडता एकरकमी मिळण्याची मागणी या वेळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
‘तक्रार साखर आयुक्तांकडेच करा’
पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, केलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेत होत नसल्याबद्दल साखर आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. यापुढे तक्रार थेट साखर आयुक्तालयांकडे करा, त्याची दखल घेऊ, असे आश्वासन आयुक्त गायकवाड यांनी दिले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp