कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे सुरू असलेली ऊसतोड स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. यावेळी कार्यकर्त्यांनी ऊसतोड कर्मचाऱ्यांचे कोयते काढून घेतल्यामुळे कारखाना समर्थक व आंदोलकांमध्ये वाद झाला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषद आज, ७ नोव्हेंबरला होत आहे. उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये प्रतिटन द्यावा, राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करावेत या प्रमुख मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’ने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, काही ठिकाणी ऊस तोडणी सुरू असल्याने स्वभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
घोसरवाड येथील महावीर बस्तवाडे हे कारखान्याचे कर्मचारी आहेत. त्यांनी मला ऊसदर परवडतोय, मी कारखान्याला ऊस पाठवणार, अशी भूमिका घेत रविवारी सकाळी ऊसतोड सुरू केली होती. घोसरवाड व दत्तवाड येथील स्वाभिमानीच्या युवा कार्यकर्त्यांनी तोडणी बंद पाडली. ऊस तोडणी कर्मचाऱ्यांच्या हातातील कोयते कार्यकर्त्यांनी काढून घेतल्यामुळे वादावादी होऊन तणाव निर्माण झाला होता. ऊसतोड झाली तरी आम्ही वाहन सोडणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे तोड थांबवण्यात आली.