नवी दिल्ली : जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत गुरुवारी फेरबदल झाला आहे. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे केवळ भारतातील सर्वात मोठे अब्जाधीश नव्हे तर त्यांनी अंबानी आणि मार्क झुकरबर्गला मागे टाकून टॉप १० यादीत आले. मात्र, शुक्रवारी फोर्बस रिअल टाइम बिलेनिअर इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांनी अदानी यांना पाठीमागे टाकून भारतातील पहिल्या क्रमांकाचे स्थापन पटकावले आहे. आज दिवसभर अदानी-अंबानी यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा लागल्याची स्थिती पाहायला मिळाली. दोघांच्याही संपत्तीमध्ये अतिशय कमी अंतर उरले आहे.
गुरुवारी मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत २९ अब्ज डॉलर्सची घट झाली. मेटा फ्लॅटफॉर्म इंकच्या स्टॉकमध्ये एका दिवसात उच्चांकी घट झाली. तर मुकेश अंबानी यांची संपत्तीही गुरुवारी १.२ अब्ज डॉलरने कमी झाली. त्याचा फायदा अदानी यांना झाला. ते १२ व्या क्रमांकावर १० व्या क्रमांकावर पोहोचले. अंबानी आता ११ व्या क्रमांकावर आहेत. यामध्ये सर्वात मोठा फटका मार्क झुकरबर्ग यांना बसला. ते टॉप १० यादीतून बाहेर पडले.
अब्जाधीश जेफ बेजोस यांची संपत्ती ११.८ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती ८४.८ अब्ज डॉलर झाली आहे. झुकरबर्ग यांच्याकडे फेसबुकच्या नावे ओळखल्या जाणाऱ्या टेक बिहमोथचा जवळपास १२.८ टक्के हिस्सा आहे.