नवी दिल्ली : अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी ११३ अब्ज डॉलर संपत्तीसोबत जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्स अनुसार, अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये या वर्षी ३६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, ती सर्वाधिक आहे.
वास्तविक, अलिकडेच बिल गेट्स यांनी आपल्या एकूण संपत्तीपैकी २० अब्ज डॉलर दान करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अब्जाधीशांच्या यादीतून त्यांचे नाव पाचव्या क्रमांकावर घसरले आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार गेट्स यांची एकूण संपत्ती ११२ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधिशांच्या यादीत अदानी ११५.६ अब्ज डॉलरची संपत्ती असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. या यादीत गेट्स यांची संपत्ती १०५.३ अब्ज डॉलर आहे.
टाइम्स नाऊ हिंदीनुसार, ब्लमुबर्ग इंडेक्समध्ये अदानीपेक्षा श्रीमंत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आहेत. मस्क २४२ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. अमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस १४८ अब्ज डॉलरची संपत्ती असून ते द्वितीय क्रमांकावर आहेत. तर लुई वुईटनचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. त्यांची एकूण संपत्ती १३७ अब्ज डॉलर आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार मस्क २५३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत आहेत. अरनॉल्ट यांची संपत्ती १५६.५ अब्ज डॉलर्स असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी हे ८८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ब्लुमबर्गच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत. तर फोर्ब्सच्या यादीत ९० अब्ज डॉलरच्या सपंत्तीसह १० व्या क्रमांकावर आहेत.