मुंबई : गौतम अदानी यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांमुळे 21 नोव्हेंबर रोजी निफ्टी आणि सेन्सेक्स जोरदार कोसळले. गौतम अदानी आणि इतर सात जणांविरुद्ध, सौरऊर्जा करार मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप न्यूयॉर्क कोर्टाने आरोप लावल्यानंतर बाजारात जोरदार पडझड पाहायला मिळाली. अदानी समूहाच्या समभागांमध्ये इंट्राडे ट्रेडमध्ये 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.बँकिंग शेअर्स, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली.
सेन्सेक्स 422.59 अंकांनी किंवा 0.54 टक्क्यांनी घसरून 77,155.79 वर आणि निफ्टी 168.60 अंकांनी किंवा 0.72 टक्क्यांनी घसरून 23,349.90 वर बंद झाला. सुमारे 1,179 शेअर्स वाढले, 2,606 शेअर्स घसरले आणि 89 शेअर्स अपरिवर्तित राहिले.आनंदी राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे फंडामेंटल रिसर्च प्रमुख नरेंद्र सोलंकी यांनी मनीकंट्रोलशी संवाद साधताना सांगितले की, अदानी प्रकरण आज बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरले. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धानेही बाजारातील मंदीला हातभार लावला. PSU बँकांना 21 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात विक्रीचा सामना करावा लागला. निफ्टी एनर्जी, मेटल, एफएमसीजी, इन्फ्रा आणि बँक शेअर जोरदार आपटले. अदानी ग्रीन, आयओसी आणि अदानी पॉवर सारख्या दिग्गज कंपन्यांतील जोरदार विक्रीचा फटका ऊर्जा निर्देशांकाला बसला. निफ्टीमध्ये सर्वात जास्त घसरण अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि एसबीआयमध्ये पाहायला मिळाली.