नवी दिल्ली : अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पोर्टसने आंध्र प्रदेशातील गंगावरम पोर्टमध्ये ३१.५ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. कंपनी १९५४ कोटी रुपये खर्चून हा हिस्सा खरेदी करेल. या वृत्तानंतर गुरुवारी अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली.
अदानी पोर्ट्सचे शेअर ५ टक्क्यांनी वाढून ७६५ रुपयांवर पोहोचले. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने (एपीएईझेड) गंगावरम पोर्ट लिमिटेडमध्ये (जीपीएल) ३१.५ टक्के हिस्सा खरेदी केल्याची घोषणा केली आहे.
गौतम अदानी समुहाची ही कंपनी हा हिस्सा वॉरबर्ग पिंक्स समुहाची कंपनी विंडी लेकसाइड इन्व्हेस्टमेंटकडून खरेदी करेल. हा १९५४ कोटी रुपयांना हा सौदा होईल. याला अद्याप नियामक संस्थेची मंजूरी मिळायची आहे.
एपीएईझेडचे सीईओ करण अदानी यांनी सांगितले की, जीपीएलचा हिस्सा खरेदी करणे, पोर्ट आणि लॉजिस्टिकसाठी नेटवर्क विकसित करणे हे आमच्या व्यवसाय विकासाचा भाग आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात अदानी ग्रुपने दिघी पोर्ट ७०५ कोटी रुपयांना खरेदी केला होता.
दरम्यान, गेल्या चार दिवसांत अदानी पोर्ट्सचे शेअर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. गुरुवारी हा शेअर ७३५ रुपयांवर खुला झाला. त्यामध्ये २.७८ टक्क्यांची वाढ होऊन तो ७४९.८५ रुपयांवर पोहोचला. एका महिन्यात हा शेअर ३१ टक्क्यांनी वाढला आहे.