नैरोबी : केनियाने कारखान्यांना ऊस पुरवठ्यात वाढ केल्यानंतर उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त साखरेची निर्यात सुरू करण्याची योजना आखली आहे. या निर्णयामुळे देशाची साखर निर्यातीतून परकीय कमाई वाढण्याची शक्यता आहे. याबाबत कृषी क्षेत्राचे नियामक असलेल्या कृषी अन्न प्राधिकरणाने (AFA) सांगितले की, संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर साखरेची निर्यात सुरू होईल.
AFA चे महासंचालक ब्रुनो लिनयरू म्हणाले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत प्रवेश करणे सुरू ठेवण्यास मदत होईल. कारण सद्यस्थिती अशी आहे की, कारखानदार उसाच्या वाढत्या पुरवठ्याच्या प्रमाणाने दबून गेले आहेत. त्यामुळे उसाच्या किमतीत घट होणे शक्य आहे. एएफएच्या महासंचालकांनी ऊस उत्पादनात वाढ होण्याचे श्रेय अनुदानित खत, नियमन आणि चांगला पाऊस या घटकांना दिले आहे. स्थानिक कारखानदारांनी जून २०२४ पर्यंतच्या सहा महिन्यांत ३,८४,५२२ टन साखरेचे उत्पादन केले. ही अधिकृत आकडेवारी साखर उत्पादनातील वाढ दर्शवते.