सोलापूर : चालू हंगामात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे जवळपास ९० लाख रुपये बिल देणे आहे. कारखान्यातील साखर व मोलॅसिस विकून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख व आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी दिली. आदिनाथ कारखान्याची आमच्यावर जबाबदारी आल्यानंतर आम्ही २०१८-१९ मधील थकीत बिले आम्ही दिली आहेत. दिवाळीत शेतकऱ्यांना या पैशाची मदत झाली, असे त्यांनी सांगितले.
प्रा. रामदास झोळ यांनी ‘आदिनाथ’ ने बिले द्यावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. याबाबत बोलताना प्रशासकीय संचालक चिवटे म्हणाले की, कारखान्याने तोडणी वाहतूकदारांचे जवळपास सव्वा कोटी रुपये दिले आहेत. पूर्वीचे थकीत लाईट बिल भरले आहे. नवीन पाईपलाईन चालू केली आहे. सहा कोटी रुपये उपलब्ध असताना आम्ही कारखाना चालू केला आहे. वाहतूक यंत्रणा न मिळाल्यामुळे अडचण झाली आहे. मात्र, १५० कोटी रुपयांचा कर्ज पुनर्गठन मागणीचा प्रस्ताव दाखल केला असून याला मंजुरी मिळाली तर ‘आदिनाथ’ला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे, असेही ते म्हणाले.