कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कारभाराची कलम ८३ अन्वये चौकशी करून कारखान्याच्या आर्थिक नुकसानीस अध्यक्ष व संचालकांना जबाबदार धरावे, दोषींवर कडक कारवाई करून कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी निवृत्त कामगार संघटनेने केली आहे.
कामगारांच्या विविध मागण्यांबाबत कारखाना निवृत्त कामगार साखर सहसंचालक व कामगार आयुक्त यांची संयुक्त बैठक १३ जून रोजी घेण्याचे आश्वासन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत म्हणाले कि, केडीसीसी बँकेने २८ अटी घालून कर्ज दिले आहे; परंतु बँकेच्या अटींचे पालन न करता कारखान्याने ही रक्कम दुसरीकडेच खर्च केली आहे. या पार्श्वभूमीवर मागणीनुसार प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी एका पत्राद्वारे कारखान्याचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी लेखा परीक्षक डी.बी.पाटील यांची नियुक्ती करून अहवाल देण्याची सूचना केली होती. याबाबत पाटील यांची भेट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून बेजबाबदारपणाची उत्तरे मिळत आहेत.
सर्व कारखान्यांत पुढील गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहे, परंतु ‘गोड साखर’मध्ये तसे काहीच दिसत नाही. गतवेळचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. केवळ सव्वा लाख टनापर्यंत उसाचे गाळप झाले. कार्यक्षेत्रातील उर्वरित ऊस शेतकऱ्यांनी स्वतः दोनशे रूपये प्रति टन खर्च करून दुसऱ्या कारखान्याला दिला. संचालक मंडळाच्या कारभारामुळेच शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले. शिष्टमंडळात आप्पासाहेब लोंढे, सुरेश पाटील, नानासाहेब चव्हाण, महादेव मांगले, दिनकर खोराटे, अरुण लोंढे, लक्ष्मण देवार्डे, अशोक कांबळे, संभाजी बुगडे, सदा कांबळे, पांडुरंग कदम, तानाजी देसाई, तुकाराम देसाई यांचा समावेश होता .