कोल्हापूर : खताचे वाढलेले दर, मजुरांची टंचाई आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही शेतकरी जिद्दीच्या जोरावर चांगले उत्पादन घेऊन अन्य शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील म्हाकवे येथील युवा शेतकरी सतीश ऊर्फ सिद्राम तुकाराम पाटील याने माळरानावर उसाचे एकरी १२० टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे. कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. त्यांनी तालुक्यात ऊस उत्पादनात हा विक्रम नोंदवला आहे. आता एकरी १४० टन उत्पादन घेण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. मात्र, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर नोकरीपेक्षाही अधिक उत्पन्न मिळविता येते, हे सतीश यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२३ मध्ये ट्रॅक्टरने नांगरट केली. मे महिन्यात शेणखत आणि कंपोस्ट खत टाकून पुन्हा नांगरट केली. पाच फुटी सरी मारून २ जून २०२३ रोजी को-८६००३२ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागण करून पुन्हा पाणी दिले. तीन महिन्यांनंतर भरणी केली. त्यानंतर रासायनिक खतांचे सहा डोस दिले. जीवाणू खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके यांच्या वेळोवेळी फवारण्या घेतल्या. या कामात एकरी एक लाख १५ हजार रुपये खर्च आला आहे, तर खर्च वजा जाता दोन लाख ९३ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे असे त्यांनी सांगितले.