नागपूर : फ्लेक्स फूएल इंजिनबाबत वाहन निर्मात्यांना सल्लादर्शक तत्त्वे (अॅडव्हायजरी) जारी करण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन एक्स्पोच्या समारोप समारंभात पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी स्पष्ट केले की, ही अॅडव्हायजरी वाहन निर्माता कंपन्यांना फ्लेक्स इंजिन उत्पादन अनिवार्य करीत नाही. हा एक फक्त सल्ला आहे. सुझूकी, ह्युंदाई आणि टोयाटो या कंपन्या फ्लेक्स इंजिन बनविण्यास तयार झाल्या आहेत. लवकरच सर्व वाहन निर्मात्यांची दिल्लीत बैठक होईल असे गडकरी यांनी सांगितले.
फ्लेक्स इंजिन पेट्रोलियम इंधन आणि इथेनॉल या दोन्ही प्रकारांवर सुरू होण्यास सक्षम असेल. गडकरी हे इथेनॉल वापरास प्रोत्साहन देत आहेत. इथेनॉल हे साखर उद्योगाचे उप उत्पादन आहे. गडकरी यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या पूर्ती समुहामध्येही साखर कारखाना आहे. गडकरी यांनी सांगितले की लवकरच इथेनॉलवर चालणाऱ्या कार, मोटारसायकल बाजारात येतील. शेतकरी हे इंधन उत्पादक असतील. इथेनॉल उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल वेंडिंग स्टेशन मंजूर केले जावेत, यावर मी भर दिला आहे, असे गडकरी म्हणाले. ऊसाशिवाय तांदूळ, भुसा सारख्या इतर जैव पदार्थांपासून इथेनॉल बनविण्यावर गडकरी भर देत आहेत.