पंजाबमधील ऊस दरवाढीनंतर हरियाणा, युपीतही दबाव वाढला

पंजाब सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट देताना ऊसाचा दर प्रती क्विंटल ३८० रुपये केला आहे. हा दर देशात सर्वाधिक आहे. या वाढीनंतर उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारवर दरवाढीसाठी दबाव वाढला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तर उत्तर प्रदेश, हरियाणात भाजपचे सरकार आहे. अशावेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांची ही मोठी खेळी मानली जात आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी वाढती महागाई पाहता ४०० रुपये प्रती क्विंटल दराची मागणी करत आहेत.

टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, आता या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी पंजाब सरकारने ऊस दर ३६० रुपये केला होता. याच दबावातून हरियाणा सरकारला दर ३६२ रुपये करावा लागला. त्यामुळे आता यंदा हरियाणात ३८० रुपये दर केला जाईल अशी अपेक्षा आहे. पंजाबमध्ये ऊसाच्या दरात वाढ होण्यापूर्वी हरियाणाच्या कृषी मंत्र्यांनी ऊस दर शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच वाढवला जाईल असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशात सध्या दर ३५० रुपये आहे. गेल्यावर्षी सरकारने यात २५ रुपयांची वाढ केली होती. केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी वाढवली आहे आणि पंजाबमध्ये दरवाढ झाल्याने येथील शेतकऱ्यांनाही आता दरवाढीची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने आधीच २०२२-२३ च्या एफआरपीमध्ये १५ रुपयांची वाढ केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here