पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप बिकट आहे. इंधनाच्या किमतीसह खाण्यापिण्याच्या वस्तूंपर्यंत सर्व स्तरावर महागाई आहे. एप्रिल महिन्यात येथे महागाईचा दर ३६ टक्क्यांपेक्षा जादा होता. एक लिटर पेट्रोल भरण्यासाठी लोकांना २७२ रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी पेट्रोलचा दर २८२ रुपये एवढ्या उच्चांकी स्तरावरही पोहोचला होता. पाकिस्तान कच्च्या तेलाची आयात रशियाकडून करण्यास तयार आहे. विशेष योजना मंत्री हसान इकबाल यांनी व्हॉइस ऑफ अमेरिकासोबतच्या एका मुलाखतीत रशियाकडून तेल आयात झाल्यास इंधनाच्या उच्च दरावर परिणाम होऊ शकतो असे म्हटले होते.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, यानंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांवर येतील का अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, याबाबत मंत्र्यांनी सांगितले की, असेही घडू शकते की दरामध्ये खास फरक पडणार नाही. मात्र, काही बदल निश्चितच घडू शकतो. रशियाकडून इंधन आयात वाढल्यास तेलाच्या किमतीत बदल होऊ शकेल. जसजसे आयातीचे प्रमाण वाढेल, तसे पेट्रोल, डिझेल दर कपातीस मदत मिळेल. जर सर्व गोष्टी योग्य पद्धतीने झाल्या तर पाकिस्तान रशियाकडून १,००,००० बॅरल प्रती दिन कच्चे तेल आयात करू शकतो असे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.