नवी दिल्ली : मंत्री नरेंद्र तोमर यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची जबाबदारीही स्वीकारणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओव्यतिरिक्त कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या तीन राज्यात विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या खासदारांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण 21 खासदार उभे केले होते. त्यापैकी 12 खासदार निवडणुकीत विजयी झाले तर 9 पराभूत झाले. 12 विजयी खासदारांपैकी 11 खासदारांनी खासदारकीचा राजीनामा दिला. खासदारकी सोडणाऱ्यांमध्ये नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप आणि रीती पाठक हे मध्य प्रदेशातील आहेत. अरुण साओ, रेणुका सिंह आणि गोमती साई हे छत्तीसगडचे आहेत तर राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी आणि किरोरी लाल मीना हे राजस्थानचे आहेत.