नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी १२० रुपये तर काही ठिकाणी २०० रुपये किलोने विक्री सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी दर कमी होवून दिलासा मिळाला आहे. आता कांद्याच्या दरात वाढ होईल असे अनुमान आहे. एका अहवालात म्हटले आहे की, कांद्याचे दर उच्चांकी स्तरापर्यंत वाढू शकतात. सध्या कांदा २८ ते ३२ रुपये किलो दराने विक्री केला जात आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऑगस्ट अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात उच्चांकी वाढ होऊ शकते. कमी पुरवठ्यामुळे हा दर पुढील महिन्यात ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचतील. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सच्या अहवालानुसार दरवाढीनंतरही या किमती २०२० मधील उच्च स्तरापेक्षा कमी असतील.
याबाबत, अहवालात नमूद केले आहे की रब्बी कांद्याचे शेल्फ लाइफ १-२ महिन्यांनी कमी झाल्यामुळे आणि यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये विक्री झाल्यामुळे खुल्या बाजारात रब्बी हंगामातील कांद्याचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दरवाढ होणार आहे. या काळात बाजाराला कांदा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.