सुलतानपूर : किसान सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना यंदाही दिलासा मिळेल अशी शक्यता नाही. कारखान्याच्या जुन्या मशीनरीची दुरुस्ती वेळेत पूर्ण झाली नसल्याने २५ नोव्हेंबर रोजी सुरू होणारा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. बॉयलरची ट्यूब बसविण्याचे काम अपुर्ण असल्याने कारखाना लवकर सुरू करणे शक्य नसल्याचे कारखान्याचे महाव्यवस्थापक प्रताप नारायण यांनी सांगितले. कारखाना कधीपर्यंत सुरू होवू शकेल याचे उत्तर ते देवू शकले नाहीत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत साखर कारखाना हाच प्रमुख मुद्दा होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप काहीच काम सुरू होवू शकले नाही. यासाठी फक्त सर्व्हे करण्यात आला असून त्यास ६०० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर सरकारने काहीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये स्वतःची फसवणूक झाल्याची भावना आहे. यावर्षी जिल्ह्यात ८,२३२ हेक्टर क्षेत्रात ऊस शेती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना फक्त किसान सहकारी साखर कारखान्याचा आधार आहे. ऊस समित्यांनी आतापर्यंत २० हजार ६७३ शेतकऱ्यांशी ऊस करार केला आहे.