‘अगस्ती’ पहिली उचल २७०० रु. देणार : चेअरमन सिताराम पाटील-गायकर

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा २०२३-२४ चा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या गळीत हंगामासाठी इतर कारखान्यांच्या बरोबरीने अगस्ती सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल २७०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चेअरमन सिताराम पाटील-गायकर व व्हॉईस चेअरमन सुनिताताई भांगरे यांनी दिली. पुढील आठवड्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

अगस्ती साखर कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये पहिली उचल रुपये २७०० प्रतिटन देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अगस्ती कारखान्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही संचालक मंडळाने रुपये २७०० प्रतिटन भाव देण्याचे ठरविलेले असल्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आंदोलन करु नये व अगस्ती कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन पाटील-गायकर आणि भांगरे यांनी केले आहे. या बैठकीसाठी कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, परबतराव नाईकवाडी, रामनाथ बापू वाकचौरे, अशोकराव देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, पाटीलबुवा सावंत, विकासराव शेटे, विक्रम नवले, मनोज देशमुख, प्रदिप हासे व कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here