मेरठ : चीनीमंडी
सहारनपूर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाची बिले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तर बँका आणि विज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. जर ऊस बिले वेळेवर मिळाली नाहीत तर आंदोलन केले जाईल असा इशारा भारतीय किसान युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष विनय कुमार चौधरी यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत भारतीय किसान युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष चौधरी यांनी सांगितले की, शेतकरी ऊस बिलांच्या प्रतिक्षेत आहेत. पैसे अडकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, विभागीय अधिकाऱ्यांना याचे काहीच देणे घेणे नसल्याची स्थिती आहे. एकीकडे उसाची बिले मिळत नाहीत तर दुसरीकडे बँका आणि विद्युत विभागाकडून वसुली सुरू आहे हे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट आले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
जिल्हाध्यक्ष चरणसिंह चौधरी म्हणाले, जर थकीत बिलांचे वितरण तातडीने झाले नाही तर गांगनौली कारखान्याची डिस्टीलरी बंद पाडली जाईल. बैठकीनंतर भारतीय किसान युनियनच्या शिष्टमंडळाने मुख्य विकास अधिकारी प्रणय सिंह यांना निवेदन दिले. उसाची थकीत बिले व्याजासह मिळावीत, खासगी कुलनलिकाधारकांचा त्रास थांबावा, गव्हाची सरकारी केंद्रांवर खरेदी सुरू करावी, देवबंद ते लाखनौर मार्गावर रेल्वेतर्फे अधिग्रहण केलेल्या जमिनींवरून शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी मार्गाची सोय करावी यांसह विविध मागण्यांचा समावेश होता. यावेळी मुकेश तोमर, अशोक कुमार, देशपाल सिंह, संजय चौधरी, अरुण राणा, भूपेंद्र त्यागी आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.