करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील 140 कामगारांचा तब्बल 41 महिन्यांचा पगार थकल्याने कामगारांनी तहसील कार्यालयामोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी आदिनाथ चे अपंग कामगार महादेव म्हस्के म्हणाले, 41 महिन्यांचा पगार कारखान्याने थकवल्याने आंम्हा कामगारांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.
सतत पाठपुरावा करुनही कामागरांचा थकीत पगार कारखान्याने दिला नाही. यामुळे या कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले. मंगळवारपासून हे सर्व कामगार उपोषणास बसल असून, बागल गटाचे नेते, अध्यक्ष व संचालक यापैकी एकही जण उपोषणकर्त्यांशी चर्चेला न आल्याने कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महादेव म्हस्के यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, कामागारांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. या परिस्थितीत पगार मागणीसाठी अर्ज, निवेदन द्यायला गेल्यावर कारखान्यात कार्यकारी संचालकांकडून दडपशाही होते. निवेदने स्विकारली जात नाहीत.
उपोषणस्थळी भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दशरथ कांबळे, शहाजी ठोसल, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील, असा इशारा सर्वच कामागारांनी दिला आहे.
याबाबत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे म्हणाले, राज्यातील साखर उद्योग अडचणीतून जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील 31 पैकी 25 कारखाने अडचणीत आहेत, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी, कामागरांना धीर देण्याचे सोडून राजकीय द्वेषातून कामगारांना भडकावत आहेत. आंम्ही कामगार, शेतकरी, व इतरांची देणी देण्यास बागल गट बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी च्या नेत्या पूजा झोळे यांनी कामगारांच्या थकीत पगाराप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे यावेळी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.