कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युईटीच्या रक्कमेप्रश्नी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत कारखान्याचे मुख्य कार्यालयच न सोडण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी, रजेच्या पगाराचे सव्वातीन कोटी रुपये देण्याबाबत प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
भोगावती कारखान्याने सात निवृत्त कर्मचाऱ्यांचा रजेचा पगार, ग्रॅच्युटी रक्कम दिलेली नाही. त्यामुळे मुख्य कार्यालयामध्ये वसंत पाटील यांच्यासह सातजणांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता प्रशासनासोबत वेळोवेळी चर्चा करून प्रत्येक पगारावेळी क्रमवारपणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक देणी देण्याचे ठरले असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील म्हणाले की, कारखान्याची स्थिती पाहता आर्थिक तरतूद झाल्यानंतर टप्प्या, टप्प्याने रकमा देणे सुरूच आहे. मध्यंतरी आर्थिक अडचण आल्याने रकमा दिल्या नाहीत. निवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे.