आजरा : आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे कामगारांशी असणारे संघर्षात्मक संबंध आणि त्यातून कामगारांना अडचणीत आणण्यासाठी कारखाना बंद ठेवण्याचे सुरु असलेले संचालकांचे आणि माजी अध्यक्षांचे षडयंत्र बंद झाले पाहिजे. ऊस वाहतूक आणि तोडणी यंत्रणेचे तब्बल साडेपाच कोटी रुपये कारखान्याकडून देय आहेत. कारखाना जर चालू नाही झाला तर 25 सप्टेबर पासून संचालक मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या पदाधिकार्यांनी दिला.
यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना विश्वास पाटील म्हणाले, कामगारांना धडा शिकण्यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि संचालक मंडळ जाणूबुजून चालू गळीत हंगाम बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. याची झळ केवळ कामगारांनाच नाही तर सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी यंत्रणा यांना बसणार आहे. यामुळे आता संघटनेने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, ऊस वाहतूक आणि तोडणी यंत्रणेचे सुमारे साडे पाच कोटी रुपये कारखान्याकडून देय आहेत. ही थकबाकी लवकरात लवकर भागवली पाहिजे. या दोन्हीही गोष्टींसाठी आता संघटना आक्रमक होणार आहे. याचाच एक भाग म्हणून रास्ता रोको, संचालकांना घेराव, वरिष्ठ कार्यालयांकडे तक्रारी असा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कारखाना संचालकांना घेवून जे उमेदवार प्रचारासाठी फिरतील त्यांच्याविरोधात यंत्रणा राबवली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
गणपतराव डोंगरे यांनी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारी शेतकरी संघटनाही आता आमच्यासोबत नसल्याची खंत व्यक्त करुन, ऊस शेतकर्यांना सोबत घेवून कारखान्याचे धुरांडे पेटत रहावे यासाठी रान उठवले जाईल, असा सज्जड इशारा दिला.
याप्रसंगी आप्पासाहेब पाटील, राजेंद्र कदम, सदाशिव कागवाडे, राजेंद्र मुरुकटे, शंकर चोथे, दयानंद भोईटे, शिवाजी हसबे, शशिकांत डोंगरे यांच्यासह ऊस वाहतूक व तोडणी यंत्रणा संघटनेचे पदाधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.