कोल्हापूर, ता. 14: साखर कारखाने सुरू होवून एक महिना झाला तरीही साखर दरात मात्र अद्यापही तेजी आलेली नाही. गेल्यावर्षी याच दिवसात प्रतिक्विंटल साखरेला 3400 ते 3500 रुपये दर होता. यावर्षी मात्र यामध्ये मोठी घट दिसून येत आहे. एक महिना झाला तरीही एक-दोन कारखाने सोडले तर राज्यातील इतर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. वेळेत एफआरपी मिळालेली नसल्याने शेतकरी संघटना आणि काही पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
राज्यातील साखर उद्योग सुरूवातील पासूनच अडचणीत सुरू आहे. कारखाने सुरू होवू एक ते दिड महिने झाले. तरीही अद्यापही एक-दोन कारखाने वगळता इतर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केलेली नाही. वेळेत उसाचे बील न दिल्यामुळे शेतकरी संघटनेसह काही पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एकीकडे यावर्षीच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना उसासाठी अपेक्षीत दर मिळालेला नाही. याउलट किमान एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र एफआरपीही वेळेत मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होणार कशी असा सवाल केला जात आहे.
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात साखर कारखाने सुरू होण्याआधी कर्नाटकच्या सिमाभागात असणारे कारखाने सुरू झाले होते. यावेळी प्रतिटन 2900 रुपये दर देवून ऊस तोड केली जात होती. आता ही ऊस तोडही 2700 ते 2800 रुपये प्रतिटन झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातही ऊस तोडी सुरू आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांना 2800 ते 3100 रुपये एफआरपी द्यावी लागते. पण ती वेळेत मिळत नसल्याने आंदोलनाचा भडका होणार असे चित्र आहे.