कोल्हापूर: डिसेंबरअखेर एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली नाही, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचा एक जानेवारीला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर महामोर्चा काढतील. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली. कसबा बावडा येथील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘एफआरपीच्या तुकडे केले जात आहेत. संघटनेचा याला विरोध आहे. यापूर्वी २०१४-१५ मध्ये असा प्रसंग आला असताना संघटनेने ८०-२० फॉर्म्युला स्वीकारला होता. त्यावेळी २० टक्क्यांपेक्षा अधिकची रक्कम सरकार हे उस विकास निधीतून कर्ज म्हणून देणार होते. आता तशी परिस्थिती नाही. केंद्र, राज्य सरकारने हात वर केले आहेत.’’
साखर कारखान्यांना तुकड्यात एफआरपी देण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील फूस लावत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे १४ दिवसांत एफआरपी दिली नाही तर साखर कारखान्यांवर कारवाईची भाषा सरकार करत आहेत. कारवाई करायची आहे तर तुमचा हात कोणी धरला आहे का? सरकारची ही दुटप्पी भूमिका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा शेटटी यांनी दिला.