सातारा : खोडवा उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतातील पाचट पेटवू नका. त्याची कुट्टी करून खत निर्मितीसाठी उपयोगात आणा. रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खताकडे वाटचाल करावी, असे आवाहन पुण्यातील माती व पाणी चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्र कुमार फाळके यांनी केले. काले येथे श्रीमंत तात्या पाटील फाऊंडेशनच्या सौजन्याने रयत-अथणी शुगर युनिट शाहूवाडी व शिवनेरी शुगर्स तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यशाळेत बदलते हवामान व पर्यावरणपूरक खोडवा उसाच्या शाश्वत विक्रमी उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. रयत अथणी कारखान्याचे युनिट हेड रवींद्र देशमुख, मुख्य शेती अधिकारी विनोद पाटील, कृषी अधिकारी अमृत भोसले, रयत युनिटचे ऊस पुरवठा अधिकारी एम. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. फाळके यांनी शेतकऱ्यांनी उसाच्या खोडव्याचे व्यवस्थापन करत असताना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. रवींद्र देशमुख यांनी कारखान्याच्या योजनांची माहिती दिली. विनोद पाटील यांचे भाषण झाले. अधिकराव पाटील यांनी स्वागत केले. सचिन जाधव, जैन इरिगेशनचे हरी देशमुख, नेटाफेमचे कल्पेश वैद्य, ऊस विकास अधिकारी कुलदीप पाटील, एम. एम. पाटील उपस्थित होते. कुलदीप पाटील यांनी आभार मानले.