खोची, जि. कोल्हापूर : ऊस उत्पादकांच्या परिस्तिथीचा विचार करून शरद सहकारी साखर कारखान्याच्या वतीने येथे बुडीत क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवली. सलग दोन दिवस साधारण तीनशे बैलगाड्या फक्त या क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी पाठविल्या. सुमारे ८० एकरहून अधिक क्षेत्रातील ऊस तोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील उत्पादकांकडून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
शरद सहकारी साखर कारखान्याने, जिल्हाधिकारी मा. श्री. दौलत देसाई यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागातील ऊस तोडण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली आहे.
वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठचे क्षेत्र पाण्याखाली गेले होते. येथील ऊस पुरामुळे खराब झाला होता. उसाचे वाढे पुरात वाहून गेल्यामुळे उसाला दिशा फुटल्या आहेत. उत्पादनात होणाऱ्या घटीमुळे हा ऊस लवकर गाळपास जाण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु, ऊसतोडणी कामगारांची बुडीत क्षेत्रातील ऊस तोडण्याची तयारी नव्हती. यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीपासून ऊस अजून शेतात पडलेल्या अवस्थेत उभाच होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाराचा वापर करण्याची वेळ आली.
यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री व शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, मुख्याधिकारी बी. ए. आवटी यांचे मार्गदर्शन लाभले. शेती मदतनीस प्रसाद बाबर, राजकुमार जांभळे व भागाधिकारी महावीर ऐनापुरे यांनी परिश्रम घेतले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.