अहिल्यादेवी नगर : अशोक सह. साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी नीरज मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. नीरज हे सिद्धार्थ मुरकुटे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या रुपाने कारखान्याचे सर्वेसर्वा, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची तिसरी पिढी साखर उद्योग क्षेत्रात आली आहे. नीरज यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी त्यांच्या आई मंजुश्री मुरकुटे यांनी राजीनामा दिला.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधित्व केले. तसेच गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ते अशोक कारखान्याची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी आमदार हेमंत ओगले यांचा मुरकुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंतर कारखान्याच्या स्वीकृत संचालिका मंजुश्री मुरकुटे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर त्यांचे चिरंजीव नीरज यांची स्वीकृत संचालक तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी कोंडिराम उंडे, पुंजाहरी शिंदे, सोपान राऊत आदी उपस्थित होते. नीरज यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.