अहिल्यानगर : १८ साखर कारखान्यांनी थकवली ४३४ कोटींची एफआरपी

अहिल्यानगर : जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांपैकी कर्मवीर काळे, मुळा, सहकारमहर्षी थोरात व साईकृपा या चारच कारखान्यांनी १०० टक्के ‘एफआरपी’ अदा केली आहे. जिल्ह्यात या साखर कारखान्यांनी चालू हंगामात आतापर्यंत ८९ लाख ३७ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. तर ७७ लाख ४४ हजार ६४३ क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन केले आहे. यापोटी कारखान्यांकडून १,८९८ कोटी ७७ लाख ९२ हजार एफआरपी रकमेचे वाटप होणे आवश्यक असतांना १,४६४ कोटी ३३ लाख ९ हजार रुपयांच्या एफआरपीचे वाटप झाले आहे. ४३४ कोटी ४४ लाख ८३ हजारांची एफआरपी रक्कम थकवली आहे. यामध्ये अगस्ती, अशोक, वृद्धेश्‍वर, केदारेश्‍वर यासह ७ कारखान्यांना ऊस उत्पादकांची ५० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी थकवली आहे.

ऊसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अदा होणे आवश्यक असतांनाही केवळ चार कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपीची रक्कम अदा झाली आहे. उर्वरित ८ कारखान्यांकडून ५० टक्केपेक्षाही कमी एफआरपीचे वाटप केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. साईकृपाने ११९.७९ टक्के तर थोरात कारखान्याने ११५ टक्के म्हणजे शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त एफआरपीचे वाटप केले आहे. मुळा व काळे कारखान्याने शंभर टक्के वाटप केले आहे. याउलट सर्वात कमी केदारेश्‍वर कारखान्याने अवघी २५.०८ टक्के रक्कम दिली आहे. साजन शुगरनेही २५.८६ टक्के, श्री स्वामी समर्थ कारखान्याने २८.०८ टक्के एफआरपीचे पैसे दिले आहेत. वृद्धेश्‍वर कारखान्याने ३५.६२ टक्के, गजाजन कारखान्याने ४६.६८ टक्के, अशोकने ४५.९० टक्के, अगस्तीने ४९.५० टक्के, डॉ. विखे पाटील कारखान्याने ५०.०८ टक्के एफआरपीचे वाटप केले आहे. काही साखर कारखान्यांनी एफआरपी अदा केली आहे. पण ती करतांना केवळ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांची पीक कर्जाची रक्कम जमा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here