अहिल्यानगर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना निवडणुकीसाठी १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि. १५ रोजी झालेल्या छाननीत २० उमेदवारी अर्ज बाद झाले होते. चार उमेदवारांनी याच दिवशी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले होते. तर सोमवारी, दि. २१ रोजी ६८ उमेदवारांनी माघारी घेतले आहे. त्यामुळे २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत २० जागा बिनविरोध झाल्या आहेत. केवळ एका जागेवर निर्णय होणे बाकी आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.
अनेक उमेदवारांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शब्दाला मान देऊन आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता एका जागेची औपचारिकता उरली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात. इंद्रजीत खेमनर, सतीशचंद्र वर्पे, रामदास धुळगंड, संपतराव गोडगे, नवनाथ आरगडे, रामनाथ कुटे, पांडुरंग घुले, विनोद हासे, गुलाब सयाजी देशमुख, संतोष रखमा हासे, अरूण सोन्याबापू वाकचौरे, योगेश भालेराव (मालदाड), लताताई गायकर, सुंदराबाई डुबे, अंकुश ताजणे, दिलीप श्रीहरी नांगरे यांचा समावेश आहे. फक्त धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे.