अहिल्यानगर : विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखान्याच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरु आहे. आतापर्यंत विभागात ५५ लाख टनांच्या वर ऊस गाळप झाला आहे. विभागात उसाचे गाळप जोरात सुरू आहेत. सध्या दररोज एक लाख हजार टनापर्यंत उसाचे गाळप होत आहे. मात्र, अद्याप बहुतांश कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला नाही. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही याबाबत गप्प आहेत. अहिल्यानगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या अहवालानुसार सध्या विभागात १ लाख टनापर्यंत प्रतिदिन ऊस गाळप होत असून, ९० हजार क्विंटलच्या जवळपास साखर उत्पादन होत आहे. आतापर्यंत ४४ लाख ९२ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात २६ साखर कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत ५५ लाख २० टन उसाचे गाळप झाले आहे. अहिल्यागरला ९४,७५० टन तर नाशिकला ९ हजार टन अशी विभागात एकूण १,११,५०० टन गाळप क्षमता आहे. अहिल्यानगरचा सरासरी साखर उतारा ८.१४ टक्के आणि नाशिकमध्ये ८.१ टक्के इतका आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात क्रांतिशुगरचा (पारनेर) १०.७८ टक्के इतरा सर्वाधिक साखर उतारा असून पाठोपाठ अगस्ती कारखान्याचा साखर उतारा १०.७७ टक्के आहे. पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वात कमी, ६.५२ टक्के आहे. दरम्यान, गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.