अहिल्यानगर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी १०९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी झालेल्या छाननीत २० उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर ६१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. निवडणुकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकट्याचे दोन अर्ज दाखल झाल्याने या गटात त्यांची बिनविरोध निवड झाली, मात्र याची घोषणा होणे बाकी आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले की, अर्जांची शुक्रवारी छाननी होणार होती, मात्र चार उमेदवारांच्या अर्जांविरुद्ध हरकत दाखल झाल्या. २० उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. आता एकूण २१ जागांसाठी १०९ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. अनेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले. यामुळे अर्जांची संख्या अधिक दिसत असली तरी, उमेदवारांची संख्या मात्र कमी आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी (दि. २९) रोजी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मंगळवारी रोहिदास गुंजाळ, गणपत दिघे, संभाजी शिंदे, दिनकर दिघे या चारजणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. दरम्यान, कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक उमेदवारांशी चर्चा केली आहे. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.