अहिल्यानगर : शेतकऱ्यांनी इफ्कोच्या नॅनो खताबरोबरच ऊस पिकासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे. हे नवीन तंत्रज्ञान अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे, असे मत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी व्यक्त केले. इफ्को अन् संजीवनी ग्रुपच्या सहकार्याने आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘ऊसपीक खत व्यवस्थापनात नॅनो खतांचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात प्रभावी वापर, विषयावर या परिसंवादात चर्चा करण्यात आली. राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या दोनशे प्रतिनिधींनी त्यात सहभाग घेतला. कोल्हे म्हणाले, ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रात मोठे फेरबदल होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर जगभर मंथन सुरू आहे; मात्र ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस पिकाला वरदान ठरणार आहे. हे सिद्ध झाले आहे. उत्पादन खर्च आणि पाण्याचा वापर कमी आणि उत्पादनात भरीव वाढ, अशी किमया या तंत्रज्ञानाने ऊसशेतीत करून दाखविली आहे.
इफ्कोचे विपणन व्यवस्थापक यू. आर. तिजारे म्हणाले, राज्यातील ३६ हजार सहकारी संस्थांच्या माध्यमांतून इफ्को आणि शेतकऱ्यांचे ५८ वर्षांचे नाते आहे. जगभर विविध खते व शेतीविषयक औषधांवर संशोधन सुरू आहे. पाणी आणि खताच्या अधिक वापरामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस कमी होत आहे. इफ्कोचे (पुणे) वरिष्ठ विपणन डॉ. एम. एस. पोवार यांनी ऊसपीक खत व्यवस्थापनामध्ये इफको नॅनो खतांचा वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, तर ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात वाढीसाठी ‘एआय’ कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर याविषयी मृदा शास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोटि, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (पुणे) पीक उत्पादन व संरक्षणातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी मार्गदर्शन केले. ‘एआय’ तंत्रज्ञान वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात हमखास ३० टक्के वाढ होवून खर्चात ४० टक्के बचत होते, हे सिद्ध झाले, असे विवेक भोईटे यांनी सांगितले. यावेळी ‘संजीवनी’चे केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सी. एन. वल्टे कारखान्याचे साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदी उपस्थित होते.