अहिल्यानगर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गणेश कारखान्याच्या संचालक मंडळासह कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि कारखान्याचे मार्गदर्शक युवा नेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन आभार मानले. राज्य सरकारने गणेश कारखान्याला ७४ कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहेत. या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, संचालक अॅड. नारायण कार्ले, भगवान टिळेकर, अनिल गाढवे, महेंद्र गोर्डे, बाबासाहेब डांगे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, आलेश कापसे, विष्णुपंत शेळके, मधुकर सातव, बलराज धनवटे, गंगाधर डांगे, संपत हिंगे, कार्यकारी संचालक नितीन भोसले आदी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना विवेक कोल्हे म्हणाले की, गणेश कारखाना पंचक्रोशीची कामधेनू आहे. संचालक मंडळ, कामगार व ऊस उत्पादकांच्या सहकार्याने कारखान्याचा सलग दुसरा गळीत हंगाम यशस्वी झाला. कारखान्यासाठी एनसीडीसी अंतर्गत मिळणारे ७४ कोटी रुपयांचे कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मंजूर झाले. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानले. फडणवीस यांनी यापुढेही कारखान्याला सहकार्य करू, असे आश्वासन दिले आहे. कर्जामुळे गणेश कारखान्यात नव्या सुधारणा करणे शक्य होईल. कारखान्याची कार्यक्षमता वाढल्याने सध्या येत असलेल्या विविध अडचणींवर मात करणे शक्य होईल.