अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याचे वडाळा महादेव येथील सभासद (कै.) विशाल दत्तात्रय कांबळे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सविता विशाल कांबळे यांना कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.कारखाना प्रशासनाने सभासदांचा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी शाखा, राहुरी यांच्याकडे अपघात विमा घेतलेला आहे. सभासदाचे अपघाती निधन झाल्यास मयत सभासदाच्या वारसाला कारखान्याचे वतीने आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने सभासदांचा अपघात विमा घेतलेला आहे.
वडाळा महादेव येथील कारखान्याचे सभासद (कै.) विशाल कांबळे यांचे अपघातात निधन झाल्यानंतर कारखाना प्रशासनाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. कंपनीने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत सभासद कांबळे यांच्या वारसांना विमा पॉलिसीपोटी एक लाख रुपये मंजूर केले. सदर रकमेचा धनादेश संचालक मंडळ बैठकीत वारस पत्नी सविता कांबळे यांना कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, संचालक कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, रामभाऊ कासार, मंजुश्री मुरकुटे यांच्यासह संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक संतोष देवकर व त्यांचे सहकारी, तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखाधिकारी दीपक मानकर आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.