अहिल्यानगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखरकारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. विधानसभा निवडणुकीमुळे पुरेसे ऊस तोडणी मजूर उपलब्ध न झाल्याने सुरुवातीला प्रतिदिन ऊस पुरवठा व गाळपाचे प्रमाण कमी होते. मतमोजणीनंतर मात्र ऊसतोड व गाळपाला गती मिळाली आहे. कारखान्याने १२ डिसेंबरपर्यंतच्या २७ दिवसांमध्ये एकूण २ लाख ९६० मेट्रिक टन ऊस गाळप करून १ लाख ४८ हजार १०० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी ही माहिती दिली.
कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, अध्यक्ष व माजी आ. नरेंद्र घुले पाटील, संचालक व माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, अॅड. देसाई देशमुख व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिदिन ९००० ते ९५०० मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, अशी यंत्रणा कार्यरत आहे. कारखान्याने आतापर्यंत २० लाख लीटर इथेनॉलची निर्मिती केली आहे. येथील ३१.५ मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्पा मधून २५ दिवसांत १ कोटी २२ लाख १२ हजार ३७६ युनीट वीज निर्मिती झाली. आतापर्यंत ६५ लाख ६३ हजार ७४० युनिट वीज निर्यात केली आहे. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पामधून बी – हेव्ही मोलॅसेसपासून २४ दिवसांत १७ लाख ०८ हजार ६५७ लीटर तर सिरपपासून ३ लाख ६० हजार ०३४ लीटर अशी २०,७८,६९१ लीटर इथेनॉलची निर्मिती झालेली आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.