अहिल्यानगर : बाभळेश्वरमध्ये आगीत चार एकर ऊस जळून खाक

अहिल्यानगर : महावितरणच्या विद्युत तारांचे घर्षण झाल्यामुळे ठिणग्या उडून लागलेल्या आगीत बाभळेश्वर येथील दोन शेतकऱ्यांचा चार एकरातील ऊस जळून खाक झाला. सकाळी ११ वाजता ही घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि राहाता नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु ती उपलब्ध झाली नाही. श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी आली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाल्यामुळे ऊस भस्मसात झालेला होता. दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून एकूण आठ लाखाहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

बाभळेश्वर येथील विलास कारभारी म्हस्के यांचा ३ एकर आणि मिना भाऊसाहेब म्हस्के यांचा एक एकर असा एकूण चार एकर ऊस जळाला. हा ऊस तोडणीस आलेला होता. या उसासोबत ठिबक सिंचन संच जळाला. त्यामुळे विलास म्हस्के यांचे सहा लाखाचे आणि मिना म्हस्के यांचे दोन लाखांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. महावितरणने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here