अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, साखर कारखानदार यांच्या उपस्थितीत ऊस दरावर बैठक झाली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी २७ साखर कारखान्यांपैकी फक्त ७ साखर कारखानदारांनी भाव जाहीर केले. तर २३ कारखान्यांच्या प्रतिनिधिंनी बैठकीकडे पाठ फिरवली. मोजक्याच कारखान्यांचे कार्यकारी संचालक, तर इतर प्रतिनिधी पाठवले होते. यावेळी शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्र सरकारने उसाची एफआरपी निश्चित केली आहे. ती १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ३,४०० रुपये ठरवली आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा दर २७०० ते २८०० रुपयांच्या पुढे जात नसल्याने संघटनांनी तीन हजारांपेक्षा कमी भाव दिल्यास जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत अशोक साखर कारखान्याने २७०० रुपये, काळे कारखान्याने २८०० रुपये, विखे साखर कारखान्याने तीन हजार रुपये, संगमनेर कारखान्याने २८०० रुपये, ज्ञानेश्वर कारखान्याने २७०० रुपये, कोल्हे कारखान्याने २८०० रुपये, केदारेश्वर कारखान्याने २७०० रुपये असा भाव जाहीर केला. कमी दर जाहीर करणे ही कारखानदारांची संघटीत गुन्हेगारी आहे, असा आरोप शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते अभिजीत पोटे यांनी केला. जिल्हा प्रशासनानं कमी भाव देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई न केल्यास जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करू, असा इशारही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रावसाहेब लवांडे, शेतकरी संघटनेचे अशोक काळे, शेतकरी प्रतिनिधी नानासाहेब पवार, दीपक पटारे, नानासाहेब तागड, रमेश भालके, सोमनाथ गर्जे, कृष्णा सातपुते, संजय वाघ, मेजर महादेव आव्हाड उपस्थित होते. यावेळी हार्वेस्टर चालकांकडून लूट सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी याची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.